सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथील मतदान केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मतदान केंद्रात जाताना आपल्या लहान मुलाला सोबत नेले होते. केवळ मुलाला सोबत नेले इतकेच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेचे गंभीर उल्लंघन करत या मुलानेच ईव्हीएमचे बटण दाबल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक प्रशासनात खळबळ उडाली. याप्रकरणी आता अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांना या गुन्ह्याचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने केवळ उमेदवारावरच नाही, तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. मतदान केंद्राध्यक्ष अण्णा बुद्धे आणि पोलीस कर्मचारी गजानन राऊत यांनी उमेदवाराला मुलासह केंद्रात प्रवेश करण्यापासून रोखले नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या दोघांनाही निलंबित करण्यास निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आणि मतदान केंद्र प्रमुखांची ही मोठी चूक असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेत इतरही काही ठिकाणी अनियमितता दिसून आली आहे. मोहोळमधील एका हॉटेलबाहेर ईव्हीएम मशीन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी झोनल अधिकारी, त्यांचे सहाय्यक आणि वाहनचालक अशा तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, निवडणूक आयोगाच्या या कडक भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे.

