कणकवली — सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन तेली यांचे कणकवलीत आज उत्साही वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
राजन तेली हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात उतरले आहेत. त्यांच्या या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्ह्याच्या दौऱ्याने करण्यात आली आहे.
या स्वागत सोहळ्याचे आयोजन शिवसेना (शिंदे गट), स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. बांदा खामदेव नाका येथे सकाळी १०:३० वाजता त्यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ११ वाजता ते सावंतवाडी कार्यालय येथे पोहोचले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख, युवा कार्यकर्ते आणि शेकडो समर्थक उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर कणकवलीत माजी आमदारांचे आगमन झालं.
“राजन तेली यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला नक्कीच फायदा होईल. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरेल,” असे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी तेली यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की,
“ही सुरुवात आहे – पुन्हा एकदा लोकसेवेचा संकल्प घेऊन, आपण सर्वजण एकत्र येऊ.”

