माईण गावात निष्काळजी वाहनचालकामुळे अपघात; ग्रामपंचायतीकडून पोलीस कारवाईची मागणी

0
266

कणकवली | प्रतिनिधी
माईण गावात एका निष्काळजी वाहनचालकामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली असून, यासंदर्भात ग्रामपंचायत माईण तर्फे कणकवली पोलीस स्टेशनला तक्रार सादर करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, श्री. अनिल बागवे (रा. भरणी) हे भरणी गावाचे सरपंच असून, माईण ते कुवळे हायस्कूल या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना दररोज स्वतःच्या वाहनातून ने-आण करतात. मात्र, ही वाहतूक करताना ते वाहन अतिवेगाने चालवतात. माईण गावातील रस्ते अरुंद व वळणावळणाचे असल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होतो.

स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने वारंवार सूचना दिल्यानंतरही श्री. बागवे यांनी आपली वाहनचालनाची पद्धत बदललेली नाही. तसेच, सूचना दिल्यानंतर त्यांनी “अपघात झाल्यास भरपाई मीच देईन” असे बेजबाबदारीने उत्तर दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दुर्दैवाने, आज त्यांच्या निष्काळजीपणामुळे गावात प्रत्यक्ष अपघात घडल्याचे ग्रामपंचायतीने तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे ग्रामपंचायत माईणने संबंधित घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि माईन गावच्या सरपंच सौ पाडावे या व्यक्त करत आहेत.