बारा किल्ल्यांना युनेस्कोची अधिकृत मोहोर; मानांकन प्रमाणपत्र मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारले!

0
1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशाचे अधिकृत प्रमाणपत्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्समधील पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात जाऊन स्वीकारले. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आता जागतिक वारसा स्थळांमध्ये झाला आहे. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या ४७ व्या अधिवेशनातील निर्णयानुसार, आज हे अधिकृत मानांकन पत्र महाराष्ट्र शासनाच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रक्रियेत फेब्रुवारी २०२५ मध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने युनेस्कोसमोर प्रभावी सादरीकरण करून मराठा साम्राज्याच्या लष्करी स्थापत्यशास्त्राचा वारसा जगासमोर मांडला होता. या यशाबद्दल बोलताना मंत्री शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानले आहेत. तसेच युनेस्कोमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांनी केलेल्या विशेष परिश्रमांचाही त्यांनी गौरव केला. हा क्षण केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगातील शिवप्रेमींसाठी गौरवाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा पुतळा युनेस्कोला भेट म्हणून देण्यात आला असून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याची स्थापना करण्यात आली होती. मंत्री आशिष शेलार यांनी या महामानवाच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता आणि बंधुतेची शिकवण युनेस्कोच्या तत्त्वांशी सुसंगत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या ऐतिहासिक प्रसंगी सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.