शिवसेना नेत्याच्या शेतात अफूचा मळा! धाराशिव पोलिसांनी उधळले मोठे रॅकेट, ७२ लाखांची झाडे जप्त

0
11

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दशमेगाव येथे एका राजकीय नेत्याच्या शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वाशी तालुका उपप्रमुख समाधान उघडे यांनी आपल्या शेतात कायद्याचे उल्लंघन करत अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतावर धाड टाकली. यावेळी शेतात डोलणारी अफूची झाडे पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत शेतातून तब्बल ४८५ किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. या जप्त केलेल्या मालाची बाजारपेठीय किंमत अंदाजे ७२ लाख ८४ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची लागवड झाल्याने परिसरात संताप आणि आश्चर्याचे वातावरण आहे.

या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी समाधान उघडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, एका जबाबदार राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणामागे अजून कोणाचे हात आहेत का, तसेच या अफूची विक्री कुठे केली जाणार होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.