मुंबई – बँकांच्या कर्जवसुलीसाठी ग्राहकांना धमकावण्याचे प्रकार वाढल्याचं आता निदर्शनास येत आहे. कर्ज वसुलीसाठी बँका वसुली एजंटची नियुक्ती करीत असल्याच्या तक्रारी समोर येवू लागल्या आहेत. या सर्वच प्रकारावर रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १ जुलैपासून कर्जवसुली संदर्भात या बँकांना काही नियमांनुसार काम करावे लागणार आहे.
कर्ज वसुलीच्या नावाखाली अनेक ठिकाणी ग्राहकांना फोन करणे, फोनवर अर्वाच्य भाषेत धमक्या देणे, कर्ज परतफेडीसाठी ग्राहकाशी गैरवर्तन करणे अशा अनेक तक्रारी सध्या समोर येत आहेत. यामुळे आता आरबीआयने कर्जवसुलीच्या वेळी काय करावे? आणि काय करु नये? असे नवीन नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक बँकेकडून घेतलेली कर्ज फेडण्यास अपयशी ठरतात तेव्हा बँका आपले पैसे परत मिळविण्यासाठी वसुली एजंटची नियुक्ती करतात. मात्र या वसुली एजंटकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने कर्ज घेण्यापासून कर्ज वसुलीपर्यंतच्या प्रक्रियेत काही नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सर्व सुधारणा १ जुलैपासून सर्वच बँकांमध्ये लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रादेशिक व्यवसायिक बँका आणि गृह निर्माण वित्त कंपन्या म्हणजेच हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी लोन वसुलीसाठी हा नवीन मसुदा नियम जारी केला आहे. यानुसार कोणताही लोन वसुली एजंट संध्याकाळी ७ नंतर ग्राहकांना फोन करु शकणार नाही. एजंटने केलेले सर्व कॉल आता रेकॉर्ड होणार आहेत.

